नवी दिल्ली : रेल्वे आणि बसेसप्रमाणे महिलांसाठी आता विमानामध्येही आरक्षित आसने ठेवण्याचा निर्णय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी घेतला आहे. खाजगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला.


शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मागणीनंतर अशोक गजपती राजू यांनी हा निर्णय घेतला. कीर्तिकर यांनी 30 नोव्हेंबर 2015 पासून ही मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

कॉर्पोरेट आणि खाजगी क्षेत्रात महिलांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अनेकदा विमान प्रवास करावा लागतो. मात्र प्रवास करताना महिलांसाठी आसनाचा विषय हा अडचणीचा ठरतो, हा मुद्दा कीर्तिकर यांनी सभागृहात मांडला होता.

महिलांना आता आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी राखीव आसने असतील, असं विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.