नवी दिल्ली: दिग्गज आयटी कंपनी अशी ख्याती असणाऱ्या विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे 2020 सालचे सर्वात दानशूर भारतीय ठरले आहेत. त्यांनी या एका वर्षात आपल्या संपत्तीपैकी 7,904 कोटी रुपयांचे दान केले. याचा जर हिशोब केला तर त्यांनी प्रतिदिन सरासरी 22 कोटी रुपयांचे दान केल्याचे लक्षात येते. भारतातील सर्वात दानशूर व्यक्तींची यादी ह्युरन इंडिया (EdelGive Hurun India Philanthropy List 2020) ने तयार केली आहे. त्यात अझीम प्रेमजी प्रथम क्रमांकावर आहेत.
भारतात कोरोनाच्या प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 1 एप्रिल रोजी अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविराधातील लढाईसाठी 1,125 कोटी रुपयांचे योगदान दिले होते. ही रक्कम विप्रोच्या वार्षिक CSR फंडाच्या आणि त्यांच्या इतर मानवतावादी कार्याच्या व्यतिरिक्त होती.
ह्युरन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनस रेहमान जुनैद यांनी सांगितले की, "अजिम प्रेमजी हे भारतीय मानवतावादी कार्य करणाऱ्या लोकांसाठी आदर्श आहेत. तसेच त्यांनी अनेक नवउद्योजकांना अशा प्रकारचे मानवतावादी कार्य करण्यास सातत्याने प्रेरणा दिली आहे."
HCL टेक्नॉलॉजीचे शिव नादर हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांनी सामाजिक कामांसाठी 795 कोटी रुपये दान केले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडियाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 458 कोटी रुपये दान केले आहेत. रिलायन्सने 30 मार्च रोजी PM CARES फंडासाठी 500 कोटी रुपयांची मदत केली होती. तसेच गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
276 कोटी रुपये सामाजिक कामांसाठी खर्च करुन कुमार मंगलम बिर्लानी या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. पाचव्या स्थानी वेदांत समुहाचे संस्थापक अनिल अगरवाल हे आहेत. त्यांनी 215 कोटी रुपयांचे दान केले आहे. त्यांनी 2014 साली त्यांच्या संपत्तीपैकी 75 टक्के संपत्ती ही दान केली होती असे हा अहवाल सांगतोय.
ह्युरन इंडिया आणि EdelGive ने बुधवारी EdelGive Hurun India Philanthropy List 2020 ही यादी सादर केली. या यादीत भारतीय उद्योगपतींनी 2020 या सालात सामाजिक कामासाठी केलेल्या दानधर्माची माहिती दिली आहे.