नागपूर : भारतीय वायू सेना अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी नेहमीच तयार होती. परंतु आता सरकारने फ्री हॅण्ड दिला आहे. त्यामुळे भारतीय वायूसेना अशा प्रकारची कारवाई करु शकली. असे प्रतिपादन भारतीय वायू सेनेचे निवृत्त एअर मार्शल शिरीष देव यांनी केले आहे. आज भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकबाबत देव बोलत होते.




देव यांनी सांगितले की, "एका मिराज 2000 विमानामध्ये 6 टन वजनाची स्फोटकं वाहून नेता येतात. आपल्याकडे 1 टन वजनाचा एक बॉम्ब आहे. त्यामुळे आज केलेल्या हल्ल्यात भारतीय वायू सेनेने दहशतवाद्यांचे खूप नुकसान केले असणार. वायूसेनेने केलेल्या हल्ल्यात किती नुकसान झाले, किती लोक मारले गेले याबाबतची संपूर्ण माहिती वायू सेनेकडे असते. नुकसान किती झालंय हे पाहण्यासाठी बॉम्बमध्ये कॅमेरा असतो, असे तंत्र विकसीत करण्यात आले आहे."

देव म्हणाले की, "गेल्या वेळी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण लष्कराची मदत घेतली होती. परंतु यावेळी आपण वायूसेनेला पाकिस्तानमध्ये घुसण्याची परवानगी दिल्यामुळे आपण पाकिस्तानमध्ये खूप आतमध्ये घुसू शकलो. विशेष म्हणजे पाकिस्तान हाय अलर्टवर असूनही आपल्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आपण पाकिस्तानमध्ये इतक्या आत घुसू असे त्यांना वाटलेच नसेल. काही जण असं म्हणत आहेत की, पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले, परंतु हे साफ खोटं आहे. प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जरी झाला असता तर मिराजमधील मिसाईल्सने त्यांची विमानं क्षणात कोसळली असती."