दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, "काही वर्षांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असलेल्या ओसामा बिन लादेनवर कारवाई केली. त्याचा अड्डा उध्वस्त करुन त्याला ठार केले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेने लादेनला ठार केल्याचे पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे."
सिंह म्हणाले की, "भारतीय वायू सेनेने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. या कारवाईची सॅटेलाईटच्या माध्यमातून छायाचित्रे मिळणे शक्य आहे. तसेच वायुसेनेकडेदेखील याबाबत काही पुरावे किंवा माहिती असू शकते. हे पुरावे आपण जगासमोर ठेवायला हवेत."
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर बॉम्बफेक केली. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 350 दहशतवादी ठार केले.