जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये पुन्हा चकमक, 4 जवान शहीद, 9 जखमी
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2019 12:00 PM (IST)
सलग तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा आणि बाबागुंड परिसरात अतिरेकी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत.
श्रीनगर : सलग तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा आणि बाबागुंड परिसरात अतिरेकी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. चार शहीदांमध्ये दोन सीआरपीएफचे जवान आणि दोन पोलीसांचा समावेश आहे. शनिवारी जम्मूमधील कुपवाडामध्ये अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत. कुपवाडा, हंदवाडा, बाबागुंड परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे. मागील 61 तासांपासून या परिसरात चकमक सुरु आहे. आतापर्यंत दोन अतिरेक्यांचे मृतदेह जवानांच्या हाती लागले आहेत. हंदवाडा परिसरात अद्याप दोन अतिरेकी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे. त्यामुळे अजूनही हंदवाडामध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे. आज सर्च ऑपरेशनदरम्यान अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीदेखील त्यास चोख प्रत्युत्तर दिले. परंतु या चकमकीत 4 जवान शहीद झाले. व्हिडीओ पाहा जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हंदवाडामध्ये सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींमध्ये लष्कराच्या सात जवानांचा समावेश आहे.