नाशिक : दोन महिन्यांपूर्वीच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश मोदी सरकारने दिले होते, असा खुलासा नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी केला आहे.


500-1000 रुपयांच्या नोटा रद्द

काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील.

अचानक घेतलेल्या या निर्णयाने देशभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र नोटा बंद करण्याच्या निर्णयाबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती. परंतु दोन महिन्यांपूर्वीच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा छपाई बंद करण्याचे आदेश सरकारने दिल्याचं आता समोर आलं आहे.



नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये आठ दिवस आधी नव्या नोटांची छपाई सुरु झाली आहे. इथे 50 कोटी नोटांची छपाई होणार आहे. यासोबतच देशातील इतर प्रेसमध्येही छपाई सुरु असल्याचं जगदीश गोडसे यांनी सांगितलं.

तसंच 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा डॉलरसारख्या दिसतात. शिवाय यामध्ये देशी शाईचा वापर केला आहे, असंही गोडसे म्हणाले.