टोल, दिल्ली मेट्रो, पेट्रोल पंपवर जुन्या नोटा घेणार
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2016 01:01 PM (IST)
नवी दिल्ली : 500, 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता नव्या पाचशेच्या आणि दोन हजाराच्या नोटा 11 नोव्हेंबरपर्यंत एटीएममध्ये उपलब्ध होणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. टोल नाक्यांवरील सुट्ट्या पैशांचा वाद पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरात टोल नाक्यांवर जुन्या नोटा नाकारल्याने वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर दिल्ली मेट्रोलाही जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दिल्ली मेट्रो जुन्या नोटा घेणार आहे. अचानक नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेट्रोल पंप, एटीएम, टोल या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. टोल नाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही सर्व पेट्रोल पंप डीलर्स आणि वितरकांना सुट्टे पैसे उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित बातम्या :