आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी अजब वक्तव्य केलं. भारतात महाभारताच्या काळातही इंटरनेटचा वापर केला जात होता, असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिका किंवा पाश्चिमात्य देश नाही, तर भारतानेच हजारो वर्षांपूर्वी इंटरनेटचा शोध लावला होता, असं ते म्हणाले.


सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कार्यशाळेत त्यांनी हे वक्तव्य केलं. ''महाभारतात काय होत होतं, हे संजयने धृतराष्ट्रला सर्व सांगितलं. म्हणजेच त्यावेळी इंटरनेट होतं, सॅटेलाईट होती आणि तंत्रज्ञानही होतं. त्या काळातही आपल्या देशात तंत्रज्ञान होतं,'' असं विप्लव देव म्हणाले.

''तंत्रज्ञानात एवढं पुढे असलेल्या देशात जन्म घेतल्याचा मला गर्व आहे. जे देश स्वतःला तंत्रज्ञानात अग्रेसर मानतात, तेच भारतीयांना त्यांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी नोकरी देतात,'' असंही विप्लव देव म्हणाले. ते आगरतळामध्ये मणिपूर, मिझोराम आणि मेघालयहून आलेल्या प्रतिनिधींना संबोधित करत होते.

अशा प्रकारचं वक्तव्य करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री हे पहिलेच नाहीत. यापूर्वीही केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवला होता. ''डार्विनचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे. शालेय अभ्यासक्रमात तो बदलण्याची गरज आहे. माणूस जेव्हापासून पृथ्वीवर दिसला, तेव्हापासून तो माणूसच आहे,'' असं सत्यपाल सिंह म्हणाले होते.