नवी दिल्ली : आम्ही आमच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना पूर्णपणे माफ केलं आहे, असं सांगताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भावुक झाले. 'आमच्या वडिलांचा, आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होतं' असंही राहुल गांधी म्हणाले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जीव घेणाऱ्यांना आपण आणि बहीण प्रियंका गांधी यांनी माफ केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
'अनेक वर्ष आम्ही निराश आणि दुखावलो होतो. पण माहित नाही... आम्ही त्यांना पूर्णपणे.. ' असं म्हणताना राहुल यांचे शब्द अडखळले. सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त करताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला.
राहुल यांनी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव यांच्या हत्येचा उल्लेख केला. एखादी भूमिका घेतल्याबद्दल आपल्या कुटुंबाला किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना होती, असं राहुल गांधी म्हणाले. 'राजकारणात तुम्ही चुकीच्या व्यक्तींशी पंगा घेतला आणि एखादी भूमिका घेतली, तर तुमचा जीव घेतला जातो.' असं राहुल म्हणाले.
'माझी आजी म्हणाली होती की तिचा मृत्यू होणार आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं होतं की त्यांचा मृत्यू होणार.' असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी 1984 मध्ये त्यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांना श्रीलंकन तमिळ महिला सुसाईड बॉम्बरने उडवलं होतं. चेन्नईजवळच्या निवडणूक रॅलीत 1991 मध्ये ही घटना घडली होती. एलटीटीईने ही हत्या घडवून आणली होती.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी राजीव गांधींच्या सात मारेकऱ्यांची जन्मठेपेतून सुटका करण्याचा प्रस्ताव मांडला होता. काँग्रेसने याचा जोरदार विरोध केला होता, मात्र त्यावेळीही राहुल गांधी यांनी वैयक्तिक मत देणं टाळलं होतं.
अशा घटनांमुळे मारेकऱ्यांमागील मानवी चेहरा पाहा, पण कोणाचा तिरस्कार करु नका, हे आम्ही शिकलो, असं राहुल गांधी म्हणाले.
सकाळ-दुपार-संध्याकाळ आणि रात्री तुमच्याभोवती 15 जणांचा गराडा असतो, हा काही नेहरु-गांधी घराण्याचा वारस असल्याचा फायदा नाही, असं राहुल गांधी म्हणाले. घराणेशाहीच्या वादावर राहुल गांधींनी आपलं मत मांडलं.
'प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचं 2009 मध्ये टीव्हीवर पाहिलं. तेव्हा दोन विचार मनात तरळले. हे अशाप्रकारे या माणसाला का त्रास देत आहेत. दुसरं म्हणजे त्याचे कुटुंबीय आणि पत्नीसाठी मला खूप वाईट वाटलं.' असं राहुल यांनी सांगितलं.
'प्रभाकरनने आपल्या बाबांना मारलं. त्याचा मृत्यू झाला, म्हणजे आपण आनंदी असायला हवं. आपण खुश का नाही' असं आपण बहिणीला म्हटल्याची आठवण राहुल गांधींनी सांगितली.
आम्ही वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलंय : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Mar 2018 11:06 AM (IST)
'माझी आजी म्हणाली होती की तिचा मृत्यू होणार आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं होतं की त्यांचा मृत्यू होणार.' असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -