नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देखील आता हॉटेल आणि विमान कंपन्यांप्रमाणेच तिकीट बुकिंगवर सूट देण्याच्या विचारात आहे. रेल्वे पूर्ण बुक न झाल्यास विमानाप्रमाणेच तिकिटात सूट दिली जाऊ शकते. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत संकेत दिले.


परवडणाऱ्या तिकीट योजनेचा अभ्यास करण्यासाठी सहा सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर बोलताना पियुष गोयल यांनी याबाबत संकेत दिले.

''विमान कंपन्या आणि हॉटेल यांच्या डायनॅमिक प्राईसिंगचा रेल्वे सध्या अभ्यास करत आहे. आतापर्यंत तिकिटाचे दर वाढू नये, यावर काम सुरु होतं. मात्र यापलिकडे जाऊन आता तिकिटाचे दर कसे स्वस्त होतील, यावर काम सुरु आहे. रेल्वेचे तिकीट संपूर्ण बुक झाले नाही, तर विमानाप्रमाणेच तिकीट बुकिंगमध्ये सवलत देण्याचा विचार आहे'', असं पियुष गोयल म्हणाले.

''हॉटेलमध्ये डायनॅमिक प्राईसिंग आहे. अगोदर किंमत कमी असते, नंतर किंमती वाढतात आणि उरलेल्या रुमसाठी वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून सूट मिळते'', असंही पियुष गोयल म्हणाले.