पुणे : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर आहे. मात्र त्यापूर्वी भाजपच्या पराभवाची भविष्यवाणी त्यांच्याच पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही, काँग्रेस बहुमताच्या जवळ असेल, असं पुण्यातील भाजपचे सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.


पुण्यात संजय काकडे एबीपी माझाशी बोलत होते. गुजरात निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येक घटकाला आपल्या टीमने मत विचारलं. या एकूण सर्वेक्षणाच्या आधारावर गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही, असं चित्र असल्याचं संजय काकडे यांनी सांगितलं.

''भावनिक मुद्द्यांवर निवडणूक झाली''

गुजरातची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झालीच नसल्याचं संजय काकडेंनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी गुजरातसाठी काय काम केलं, ते गुजरातला काय देणार किंवा दिलं आहे, असे कोणतेही मुद्दे गुजरातच्या प्रचारात वापरण्यात आले नाही. केवळ भावनिक मुद्द्यांवर निवडणूक झाली, असा घरचा आहेर संजय काकडे यांनी पक्षाला दिलाय.

स्वातंत्र्यापासून कोणताही पक्ष 25 वर्षांपेक्षा जास्त काळ सलग सत्तेत राहिलेला नाही. गुजरातमध्ये 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळीही सत्ता आल्यास पुढच्या निडणुकीपर्यंत 27 वर्ष पूर्ण झालेली असतील. याचं सर्व श्रेय मोदींना जाईल, मात्र आपल्या अंदाजानुसार भाजपची सत्ता येणार नाही, असं संजय काकडे म्हणाले.

विविध न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार गुजरातमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर दुसरीकडे पक्षातीलच खासदाराने पराभवाची भविष्यवाणी केली आहे. या सर्व अंदाजांचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. दोन टप्प्यात 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभेसाठी मतदान झालं होतं.