नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापवणारी एक नाट्यमय घोषणा आज झालीय. ज्या नंदीग्राममधून तृणमूलसमोर सर्वात मोठं बंडखोरीचं आव्हान उभं राहिलं आहे, त्याच नंदीग्राममध्ये स्वत: मैदानात उतरण्याचं ममता बॅनर्जींनी ठरवलं आहे. गेली अनेक वर्षे नंदीग्रामचं प्रतिनिधित्व करणारे सुवेंदू अधिकारी हे नुकतेच ममतांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत. ममतांच्या कॅबिनेटमध्ये नंबर दोनचे मंत्री असा त्यांचा उल्लेख होत होता. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुवेंदू हे भाजपमध्ये सामील झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज नंदीग्राममध्ये तृणमूलनं जाहीर सभा घेत आपलं शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी ममतांनी ही घोषणा केली.


'माझं अंतर्मन मला सांगत आलेलं आहे नंदीग्राम हे नेहमीच माझ्यासाठी लकी स्थान राहिलेलं आहे. माझ्यासाठी ते कायम पवित्र आहे. त्यामुळे मी नंदीग्राममधून लढलं पाहिजे. मी आमचे प्रदेशाध्यक्ष सुब्रतो बक्षी यांना विनंती करते की त्यांनी नंदीग्राममधून माझ्या उमेदवारीला परवानगी द्यावी, असं ममता नंदीग्रामच्या जाहीर सभेत म्हणाल्या. ममता बॅनर्जी या सध्या कोलकात्याच्या भवानीपूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येतात. हाच त्यांचा पारपंरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे भवानीपूर मतदारसंघातून ममतांऐवजी दुसरा कुणी उमेदवार तृणमूल देणार की दोन्ही मतदारसंघातून ममता लढणार याचीही उत्सुकता असेल.


नंदीग्राम आणि सिंगूरमधल्या आंदोलनातूनच ममता बॅनर्जी यांचा राजकीय क्षितीजावर उदय झाला होता. डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लावणारं वादळी आंदोलन त्यांनी याच भूमीतून सुरु केलं होतं. पण दोन टर्म सत्ता सांभाळल्यानंतर याच नंदीग्राममधून त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी आता भाजपची साथ धरली आहे. आज ममतांच्या या घोषणेनंतर अधिकारी यांनीही प्रतिआव्हान दिलं आहे.

ममतांना नंदीग्राममधून हरवूनच दाखवेन अन्यथा राजकारण सोडून देईन अशी गर्जना सुवेंदू यांनी केली आहे. 2006 पासून सुवेंदू इथे आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांचे वडील हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. तसेच सुवेंदू यांचे दोन भाऊही राजकारणात असून त्यांचीही या भागात पकड आहे. ममतांच्या सरकारमध्ये परिवहन खातं सांभाळणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी नुकताच अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.