WB Election 2021 Phase 4 : आज पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात 5 जिल्ह्यातील 44 जागांवर मतदान होत आहे. हावडा जिल्ह्यातील 8 जागांवर, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 11 जागा, हुगळी जिल्ह्यातील 11 जागा, अलीपुरद्वारमध्ये 5 जागा आणि कूचबिहार मधील सर्व 9 जागांवर मतदान होत आहे. 44 जागांपैकी 8 जागा दलित, 3 आदिवासी आणि 33 सर्वसाधारण जागा आहेत. साडेपाच वाजेपर्यंत 76 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, कूचबिहारमध्ये CISF च्या गोळीबारात चार लोकांचा मृत्यू झाला आहे.


कूचबहार गोळीबार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : ममता
बंगालच्या कूचबिहारमधील सितलकुची येथे झालेल्या गोळीबारावरुन तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. याचवेळी ममता यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केलं असून सीतलकुचीमधील मतदारांवर सीआरपीएफने गोळीबार केल्याचा आरोप केलाय. मात्र, सीआरपीएफने हा आरोप फेटाळून लावला आहे. सीतलकुची, कूचबिहार येथील बूथ क्रमांक -126 च्या बाहेर सीआरपीएफ तैनात नव्हते. या घटनेत कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण सीआरपीएफकडून देण्यात आले आहे.


विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदाना दरम्यान कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुची येथे केंद्रीय दलाच्या गोळीबारात लोकांनी आपले प्राण का गमावले? या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्यावं, अशी मागणी एका जाहीर सभेत बॅनर्जी यांनी केलीय. केंद्रीय दलाचे अत्याचार पाहून आपल्याला बराच काळपासून असं होण्याची भीती वाटत होती असा दावा त्यांनी केलाय.


बंगालच्या पहिल्या तीन टप्प्यात 91 जागांवर मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यात 373 उमेदवार रिंगणात आहेत. मागील वेळी या जागांवर 80.93 टक्के मतदान झाले होते. 2016 च्या निवडणुकीत टीएमसीने 44 पैकी 39 जागा, 2 सीपीएम, 1फॉरवर्ड ब्लॉक, 1 भाजप आणि एका जागेवर काँग्रेसने विजय मिळविला होता. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 25 जागांवर टीएमसी तर 19 जागांवर भाजप पुढे होते.


बंगालमधील चौथ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी 793 सेंट्रल फोर्स तैनात आहेत. कोलकाता आणि दक्षिण 24 परगणाच्या जागांवर 101 केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. 103 सेंट्रल फोर्स हावडा कमिशनरेट क्षेत्रात आहे. हावडा ग्रामीण भागात 37 सेंट्रल फोर्सच्या उपस्थितीत निवडणुका होणार आहेत. उत्तर बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यात 99 सेंट्रल सिक्युरिटी फोर्स तैनात आहेत. मध्यवर्ती निवडणुका घेण्यासाठी जलपाईगुडी येथे 6, डायमंड हार्बरमध्ये 39, बारुईपुरात 45, चंदननगर आयुक्तालय क्षेत्रात 84 सेंट्रल फोर्स आणि हुगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 91 सेंट्रल फोर्स कार्यरत आहेत. कोची जिल्ह्यात 188 सेंट्रल फोर्सेस तैनात करण्यात आल्या आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 या वेळेत मतदान होणार आहे.