नवी दिल्ली :  देशात कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीला बसला असून त्याच्या विक्रीत 9.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. 1998-99 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर  पेट्रोलियमच्या विक्रीत घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. 2021 साली पेट्रोलियम उत्पादनांची विक्री ही 194.7 मिलियन टन (MT) इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही विक्री 214.12 मिलियन टन (MT) इतकी होती. देशव्यापी लॉकडाऊनचा फटका वाहतुकीला बसला असून त्यामुळेच इंधनाच्या विक्रीत घट झाल्याचं सांगण्यात येतंय. 


डिझेलच्या वापरात 11.9 टक्क्यांची घट
देशव्यापी लॉकडाऊनचा फटका डिझेललाही बसला असून त्याच्या विक्रीत 11.9 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलंय. ही आकडेवारी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अॅन्ड अॅनालिसिस सेल (PPAC) ने जाहीर केली आहे. 


1998-99 सालानंतर पहिल्यांदाच पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अॅन्ड अॅनालिसिस सेल (PPAC) ने जाहीर केलेली ही आकडेवारी 31 मार्च पर्यंतची आहे.


एव्हिएशन टरबाइन फ्यूएलची विक्री तब्बल 53.2 टक्क्यांनी घसरून 3.7 MT झाली आहे. भारतासहित जगभरात कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीवर बंदी आल्याने एव्हिएशन टरबाइन फ्यूएलची विक्री इतक्या मोठ्या प्रमाणात घटल्याचं सांगण्यात येतंय. तर घरघुती वापराच्या इंधनाचा म्हणजे लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसचा (LPG) चा वापर या वर्षी 4.9 टक्क्यांनी वाढला असून तो 27.6 MT इतका झाला आहे.


गेल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन लावला होता. या काळात सर्वच उद्योग, वाहतूक आणि इतर गोष्टी बंद होत्या. जून महिन्यानंतर टप्प्या-टप्प्याने तो उठवण्यात आला. या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी फटका बसला असून त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले. तसेच त्यामुळे अनेकांना आपल्या रोजगाराला मुकावं लागलं.



महत्वाच्या बातम्या :