कोलकाता : सोशल मीडियाच्या युगात प्रचाराच्या पद्धती कदाचित आधुनिक झाल्या असतील पण पश्चिम बंगालमध्ये आजही राजकीय पक्ष जुन्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. देशातील सर्वात जुन्या महानगरांपैकी एक कोलकाता. जिथे पाहाल तेथे रस्त्यांच्या कडेला असलेल्या भिंतींवर चित्रांद्वारे प्रचार पहायला मिळतो. कोलकात्यामध्ये भिंतींवर केलेल्या चित्रांच्या माध्यमातून राजकीय प्रचार बऱ्याच प्रमाणात दिसून येतो.
कोलकाता शहरात तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिंतीवर ब्रशपेंटिंग तयार करताना दिसून आले. यामध्ये केवळ निवडणूक चिन्ह किंवा उमेदवाराचे नावच नाही तर बरीच व्यंगचित्रे बनवून लोकांना त्यांच्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये ममता दिदींची टीएमसी अग्रस्थानी दिसून येत आहे. कोलकातासह राज्यातील इतर शहरांमध्ये वॉल पेंटिंगबरोबरच फ्लेक्स आणि पोस्टर्स दिसून येतात.
सर्वाधिक भिंतीचित्र ही कोलकात्यामधील टांग्रा परिसरात दिसून येतात ज्याला चायना टाऊन म्हणून ओळखले जाते. इथे चीनी मूळचे लोक येथे स्थायिक झाले आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी चीनमधून बंगालमध्ये स्थायिक झालेल्या लोकांनी येथे आपले घर केले आणि कालांतराने ते कोलकात्याचे नागरिकही झाले. आता हे सर्व लोक मतदार आहेत आणि त्यांची मते मिळविण्यासाठी भिंतींवर चिनी भाषेत घोषणा लिहिलेल्या आहेत.
कोलकात्यामध्ये बनविलेल्या वॉल पेंटिंगमध्ये व्यंगचित्रांचा वापर देखील केला गेला आहे. या व्यंगचित्रांमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्याविरूद्ध टीका, कोरोना काळातील लॉकडाउन, अनेक दुर्घटना, महागाई, काळा पैसा, अर्थव्यवस्था यांवर भाष्य केलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळातील कर्तृत्वही भिंतीवरील पेंटिंगच्या माध्यमातून दर्शवण्यात आलं आहे. ममता दिदींच्या कार्यकाळात लोकांना विविध योजनांमधून काय फायदा दिला जात आहे हे यातून दाखवलं आहे. आरोग्य सुविधा, विधवा पेन्शन, कन्या योजना, मोफत रेशन, विवाह योजना, विद्यार्थ्यांसाठी सायकल योजना अशा योजनांचा उल्लेखही यात दिसतो.
आम्ही जेव्हा भिंतीवर चित्र काढत असलेल्या एका व्यक्तिला बोललो त्यावेळी त्याने सांगितलं की, त्याला प्रति चित्राला त्याला 500 रुपये दिले जातात. टीएमसी कार्यकर्त्याने सांगितले की, कुणाचंही भांडण होऊ नये म्हणून भिंतीवर पेंटिंग करण्यापूर्वी परवानगी घेतली जाते.
सध्या कोलकात्यातील रस्ते आणि भिंती आपल्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हसर्या चित्रांनी भरलेले दिसून आहेत. ममता बॅनर्जी यांच्या आक्रमक निवडणूक प्रचाराचा अंदाज या भिंतीचित्राच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो.