नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. बांकुडा येथील निवडणूक प्रचारसभेत त्यांनी काही लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग अमित शाह चालवत आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या काही घटनांचा आधार घेत ममता बॅनर्जी यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली.
माझी हत्या करण्याचा कट आखला जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाकडून आपली सुरक्षाही हटवण्यात आल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री देश चालवणार की, बंगालमध्ये आम्हाला धक्का देण्यासाठी कट रचणार, असा प्रश्नार्थक सूर आळवत त्यांनी जोरदार टोला लगावला.
नंदीग्राम येथे झालेल्या एका प्रचारसभेमध्ये ममता बॅनर्जी यांना दुखापत झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेनंतर निवडणूक आयोगाने सुरक्षा संचालक विवेक सहाय आणि पूर्व मेदिनीपूरचे पोलीस संचालक प्रवीण प्रकाश यांना 14 मार्चला निलंबित केलं.
In Pics | 'मी प्रचारासाठी पुन्हा येईन'... ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना संदेश
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार स्टार प्रचारक असूनही ममता बॅनर्जी बुलेटप्रूफ वाहनाचा वापर करत नाहीत. त्यामुळं बॅनर्जी यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्याच मंडळींची यात चूक आहे अशी माहिती समोर आली.