मुंबई : युट्यूब किंवा इतर समाजमाध्यमांमध्ये सर्वाधिक गाजणाऱ्या व्हिडीओ असतात, त्या म्हणजे खाद्यपदार्थांच्या. विविध ठिकाणची खाद्यसंस्कृती याच माध्यमातून आपल्या भेटीला येते. काही अफलातून पाककृती पाहून याच माध्यमातून अनेकांनीच आपल्या पाककौशल्यात प्रावीण्य मिळवलं आहे. अशा या जगतात काही मंडळी हे त्यांच्या अफलातून संकल्पनांमुळं प्रसिद्धीझोतात आले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करत आहे. 


हैराण, अर्थातच सकारात्मक पद्धतीनं. कारण, या व्हिडीओमध्ये चक्क एका प्रेशर कुकरमध्ये चपात्या/ पोळ्या बनताना (भाजून निघताना) दिसत आहेत. तवा नसेल तरी हरकत नाही, कुकरमध्येही पोळ्या बनूच शकतात, हे नुकतंच एका महिलेनं सोशल मीडियावर दाखवून दिलं आहे. 


सहसा प्रेशर कुकरच्या मदतीनं स्वयंपाकघरातील अनेक कामं ही अधिक सोप्या पद्धतीनं आमि कमी वेळात केली जातात. त्यामुळं गृहिणींच्या किंवा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच हा प्रेशर कुकर म्हणजे मोठ्या मदतीचा मित्र. अशा या प्रेशर कुकरचा आणखी एक वापर एका महिलेनं सर्वांसमोर आणला आहे. 


Travel News : कोरोना काळातही तुम्ही कोणत्या देशांत प्रवास करु शकता?


व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ही महिला गॅस सुरु करते आणि त्यावर रिकामा प्रेशर कुकर ठेवताना दिसते. मोठ्या आचेवर ती कुकर ठेवते. ज्यानंतर ती चपात्या/ पोळ्या लाटते आणि त्यानंतर लाटलेल्या गोलाकार पोळ्या प्रेशर कुकरमध्ये टाकते. पुढे प्रेशर कुकरचं झाकण बंद करते. यादरम्यान, दोन मिनिटं प्रतीक्षा करा असा इशारा ती व्ह्यूअर्सना देते. 



काही क्षणांनी ती कुकर उघडते तो काय, यामधून ती बाहेर काढते पूर्णपणे नीट प्रकारे भाजल्या गेलेल्या पोळ्या. या पोळ्या एका ताटात घेत त्या किती चांगल्या प्रकारे भाजल्या गेल्या आहेत हे ती दाखवून देते. हा व्हिडीओ पाहत असताना महिलेल्या या अफलातून कारागिरीनं सर्वांनाच धक्काही बसतोय, पण ही किमया पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसूही उमटत आहे हे खरं.