बेळगाव:  कर्नाटकात पुन्हा लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढवण्यात आल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी केली आहे. त्यामुळे आता कर्नाटकात सात जून सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यापूर्वीचा लॉकडाऊन 24 मे रोजी संपणार होता.पण सरकारने त्यापूर्वीच पुढील दोन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.


सकाळी मुख्य सचिवांनी तज्ञ समितीशी बैठक घेवून चर्चा करून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता.आज सायंकाळी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून राज्यातील परिस्थिती आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी उपायावर चर्चा केली. तांत्रिक समितीने देखील पुन्हा दोन आठवडे लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दोन आठवडे पुन्हा लॉक डाऊन वाढवण्याची घोषणा केली. 


लॉकडाऊनमध्ये पूर्वी जाहीर केलेले नियम लागू असणार आहेत. दररोज सकाळी सहा ते दहा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल.नंतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.बस वाहतूक देखील बंदच राहणार आहे.


लॉकडाऊनचे पालन जनता गांभीर्याने करत नसल्याचे लक्षात आले असून जनतेने सकाळी पावणे दहा वाजता म्हणजे खरेदी करून घरी पोचले पाहिजे.दहा नंतर रस्त्यावर दिसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.


कोरोना साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊन अंमलबजावणी कडकपणे होणे आवश्यक आहे. नियम कडक पाळणे जनतेच्या हातात आहे. लॉकडाऊन कडक अंमलबजावणी करण्यासंबंधी पोलीस खात्याला देखील सूचना करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.