Cyclone Tauktae Video : शुक्रवारपासूनच अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळासाठी पूरक परिस्थिती पाहायला मिळाली आणि रविवापरपर्यंत या वादळानं आणखी तीव्र रुप धारण केलं. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर या वादळामुळं सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पाऊस सुरु झाला असून, केरळ आणि कर्नाटकालाही याचा फटका बसला आहे. 
केरळमध्ये सध्या वादळानं रौद्र रुप धारण केलं असून, यामुळं अनेक भागांत नुकसानही झाल्याचं वृत्त आहे. सोशल मीडियावर अनेकांनीच या वादळाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यामुळे किनारीभागात राहणाऱ्या जनसामान्यांचं जीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.


केरळमधील Kasargod भागात एक दुमजली बंगला पत्त्यांच्या मिनाराप्रमाणं कोसळला आणि क्षणार्धात तो जमिनदोस्त झाला. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार या भागात एर्नाकुलम, इडुक्की, त्रिसूर, पालक्कड, मलप्पूरम, कोझिकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड या भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. 


केरळमध्ये सध्या वादळाचे अधिक विध्वंसक परिणाम दिसत असून, अनेक ठिकाणी झाडं आणि वीजेचे खांब कोसळले ज्यामुळं वीजपुरवठाही खंडीत झाला. समुद्राचं पाणी किनाऱ्यालगतच्या घरांमध्ये शिरल्यामुळे या वादळानं झालेलं नुकसान स्पष्टपणे दिसत आहे. 






महाराष्ट्रही अलर्टवर 


मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या. 


तोक्ते चक्रीवादळाचा प्रभवा विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहाव आणि मनुष्यबळ तसंच साधनसामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. 


दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ 18 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.