नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी आहे. कोरोनामुळे भारतात दररोज पाच हजार लोकांचा मृत्यू होईल असा धक्कादायक निष्कर्ष वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात समोर आला आहे. सध्या सातत्याने भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढतेय. एप्रिल ते जुलै या काळात भारतातील तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यामध्ये आता दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची भर पडतेय. गेल्या चार दिवसात देशात 13 लाख नव्या रुग्णांची भर पडली असून शनिवारी जवळपास साडेतीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. तसेच शनिवारी एकाच दिवशी 2767 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ही आकडेवारी जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात असं सांगण्यात आलंय की, सध्या जो कोरोनामुळे मृतांचा आकडा दोन ते तीन हजारांच्या दरम्यान आहे, तो पुढच्या महिन्यापासून पाच हजारांच्या वर जाण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुलै या अडीच महिन्यांच्या काळात जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे असंही या अभ्यासात सांगण्यात आलंय.
लसीकरणाचा वेग वाढवायला हवा
जिथे समस्या असते, तिथे समस्या सोडवण्यासाठी काहीना काही तोडगा नक्की असतो. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासातही ही समस्या सोडवण्यासाठी एक उपाय सांगण्यात आलेला आहे. या अभ्यासात असं सांगण्यात आलंय की देशातील कोरोनाचं पुढचं संकट टाळायचं असेल तर लसीकरणाच्या कार्यक्रमाचा वेग वाढवायला हवा. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी, तसेच सरकारने देशातील लसींचा पुरवठा वाढवायला हवा. लवकरात लवकर सर्वांचं लसीकरण करायला हवं. त्यामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याद्वारे पुढची हाणी टाळता येईल.
वाचकांना घाबरवण्यासाठी नाहीतर, सतर्क करण्यासाठी ही माहिती आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. तसेच एबीपी माझा सर्वांना आवाहन करतंय की, स्वतःची काळजी घ्या. कोरोना नियमांंच पालन करा.
महत्वाच्या बातम्या :
- Corona | कोरोनाच्या लसीकरणासाठी 18 वर्षावरील व्यक्तींनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं; केंद्र सरकारचं आवाहन
- India Corona Case Today : देशात सलग चौथ्या दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद; 24 तासांत 2767 रुग्णांचा मृत्यू
- हवाई दलाने सांभाळला मोर्चा : ऑक्सिजन टँकर घेऊन सिंगापूरहून परत, नौदलही बजावतंय महत्वाची भूमिका