नवी दिल्ली : येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या 18 ते 45 वर्षावरील 28 एप्रिलपासून आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. कोरोना लसीकरणाच्या केंद्रावर जाऊन थेट लस मिळणार नाही. त्यामुळे या वयोगटातील लोकांनी आपल्या नावाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करावी असं आवाहन केंद्र सरकारने केंल आहे. केंद्र सरकारच्या कोविन अॅप आणि cowin.gov.in या वेबसाईटवर लसीसाठी नोंद करता येणार आहे.


ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याने लसीचे नियोजन करायला मदत मिळेल तसेच लसीकरण केंद्रावरची गर्दी कमी होण्यास मदत होईल असंही सांगण्यात येतंय. भारतात आतापर्यंत 14 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत केवल 11.6 टक्के लोकांनीच कोरोनाच्या पहिल्या डोससाठी ऑनलाईन पद्धतीने नोंद केली आहे. केंद्र सरकारनेही राज्य सरकारांना ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करावं अशा सूचना दिल्या आहेत. 


देशात 1 मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार असून त्यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


आता राज्यांना थेट कंपन्यांकडून कोरोनाची लस खरेदी करण्याची मूभा केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार आता राज्य सरकार खुल्या बाजारातून लस खरेदी करू शकतात. 


महाराष्ट्रात व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम
महाराष्ट्रात येत्या एक मेपासून व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात येत असून त्यामध्ये जवळपास 8.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


महत्वाच्या बातम्या :