बंगळुरु : केस सरळ करण्याच्या सौंदर्योपचारांनंतर (हेअर स्ट्रेटनिंग) केसगळती वाढल्यामुळे व्यथित झालेल्या विद्यार्थिनीने आपलं आयुष्य संपवलं. म्हैसूरमध्ये बीबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. तरुणीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्थानिक ब्यूटी पार्लरविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.


नेहा गंगम्मा नामक तरुणीने काहीच दिवसांपूर्वी म्हैसूरमध्ये हेअर स्ट्रेटनिंग करुन घेतलं होतं. मात्र त्यानंतर तिचे केस मोठ्या प्रमाणात गळायला लागले होते. आपल्याला पूर्णपणे टक्कल पडेल, अशी भीती नेहाला सतावू लागली होती.

'माझ्या मुलीने मला फोन केला. तिचे केस विरळ होत असल्यामुळे तिला कॉलेजला जायची इच्छा नव्हती. केसांच्या उपचारानंतर आपल्या त्वचेला अॅलर्जी झाल्याचंही तिने सांगितलं. कॉलेजला गेलो तर मित्र-मैत्रिणी नकोसे प्रश्न विचारतील. त्यामुळे मी वर्षभर कॉलेजला जाणार नाही, असंही नेहा म्हणाली होती' असा दावा नेहाच्या आई शैला यांनी केला आहे

म्हैसूरमध्ये नेहा पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. 28 ऑगस्टपासून नेहा बेपत्ता झाल्याने तिच्या घरमालकांनी पालकांना कळवलं. पालकांनी स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र 1 सप्टेंबरला तिचा मृतदेह लक्ष्मणतीर्थ नदीत आढळला.