नवी दिल्ली : व्ही. के. सिंग यांनी सूडबुद्धीने माझी बढती रोखली, असा आरोप भारताचे लष्करप्रमुख दलबीर सिंग यांनी केला आहे. माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे.


 
तथ्यहीन, खोटी आणि काल्पनिक कारणं देत सिंग यांनी आपलं प्रमोशन थांबवून ठेवल्याचा दावा दलबीर सिंग यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. दलबिर सिंग यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबद्दलचा उल्लेख केला आहे.

 
2012 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी माझा छळ करण्याचा प्रयत्न केला होता. लष्कप्रमुखपदी होणारी माझी बढती रोखणं, हेच तेव्हा व्ही. के. सिंग यांचं उद्दिष्ट असल्याचा आरोप दलबीर सिंग यांनी केला आहे.

 
19 मे 2012 रोजी मला पाठवलेल्या नोटीशीमध्ये तथ्यहीन, खोटे आणि कपोकल्पित आरोप करण्यात आले होते. त्यावेळी माझ्यावर अवैधपणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचंही दलबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

 
आसामच्या जोरहाटमध्ये डिसेंबर 2011 मध्ये झालेल्या लष्करी कारवाईची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत व्ही. के. सिंग यांनी एप्रिल 2012 ते मे 2012 या कालावधीत दलबीर सिंग यांच्यावर निर्बंध आणले होते.

 
मात्र हा प्रकार घडला तेव्हा आपण जनरल ऑफिसर पदी होतो, त्याचप्रमाणे आपल्याकडे दिमापूरच्या लष्करी तळावरच्या तीन कॉर्प्सची जबाबदारी होती. जोरहाटमध्ये लष्करी कारवाई झाली त्यावेळी मी सुट्टीवर होतो आणि मी 26 डिसेंबरला परतलो, असं दलबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

 
दलबीर सिंग यांची लष्कप्रमुखपदी नियुक्ती करताना पक्षपात झाल्याच्या आरोपातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. त्याला उत्तर देताना दलबीर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.