पणजी (गोवा) : काँग्रेसमधील अंतर्गत राजकरणाला कंटाळून वाळपईचे काँग्रेसचे माजी आमदार विश्वजीत राणे यांनी आज हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
वाळपई नगरपालिका मंडळाचे नगराध्यक्ष, 8 नगरसेवक, 2 जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासह अनेक सरपंच आणि पंच सदस्यांनी आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितित भाजपमध्ये प्रवेश केला.
विश्वजीत राणे भाजपमध्ये हजारो समर्थकांसह आल्यामुळे सत्तरी तालुक्यात भाजपची ताकद वाढली असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट करत सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले.
सत्तरी तालुक्यात भाजपला मजबूत करण्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत. वाळपई बरोबर सत्तरी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले ध्येय असल्याचे विश्वजीत राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी राणे हजारो समर्थकांसह भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढली असून सत्तरीमधील विकास कामे करून भाजपचा विस्तार केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.