पणजी (गोवा) : गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले विश्वजित राणे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे.


काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणारे या पाच महिन्यांतील हे तिसरे नेते ठरले आहेत.

विश्वजित राणे आज (6 एप्रिल) भाजप प्रवेश घेणार आहेत. मात्र, त्यांनी या प्रवेशाबाबत कोणतीही अट घातलेली नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले प्रतापसिंह राणे यांचे विश्वजित राणे हे चिरंजीव. प्रतापसिंह राणेही विश्वजित यांच्या निर्णयावर नाराज असल्याचे काँग्रेस सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाजप प्रवेशानंतर विश्वजित राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. गोव्यातील भाजप विधीमंडळ आणि मंत्रिमंडळानेही विश्वजित राणे यांचा पक्ष प्रवेश व मंत्रिमंडळ समावेशाला मान्यता दिली आहे.

विश्वजित राणे यांनीही भाजप प्रवेशाला दुजोरा दिला आहे. आपला भाजप प्रवेश हा अटीवर असेल. आपल्याला पक्षासाठी काम करायचे आहे आणि मतदारसंघाचा विकास करायचा आहे, असे विश्वजित यांनी स्पष्ट केले.

विश्वजित राणे यांनी मार्च महिन्यात काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याने नाराज होऊन विश्वजित राणे यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेसचे 17 आमदार निवडून आले असतानाही काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही. उलट भाजपचे केवळ 13 आमदार निवडून आले असतानाही भाजपने सरकार स्थापन केले.

विश्वजित राणेंना मिळणार आरोग्य खाते

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोवा भेटीअगोदर विश्वजित राणे यांचा भाजप प्रवेश करण्याचे भाजपने निश्चित केले आहे. पक्ष प्रवेशानंतर राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यांना आरोग्य खाते दिले जाण्याची शक्यता आहे.