पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राफेल घोटाळ्याप्रकरणी कुठलंही वक्तव्य केलं नाही. काँग्रेसनं व्हायरल केलेली ऑडिओ क्लीप बनावट आहे, असा दावा गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी केला आहे.

बुधवारी सकाळी काँग्रेसने विश्वजीत राणेंची एक ऑडिओ क्लीप पत्रकार परिषदेत सादर केली होती. ज्यात गोव्यातील कॅबिनेट बैठकीतील पर्रिकर यांच्या एका वक्तव्याचा दाखला काँग्रेसने दिला होता. या क्लिपमध्ये गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे एका व्यक्तीशी बोलत आहेत.

मला कोणीही काही करु शकत नाही. माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती आहे, असं पर्रिकर यांनी म्हटल्याचा दावा राणेंनी केलाय. मात्र आता ही क्लीपच बनावट असल्याचा दावा विश्वजीत राणे यांनी केला आहे.

दरम्यान माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ट्विटद्वारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राफेल डीलसंबंधीची क्लिप खोटी असून यावर गोव्याच्या मंत्रिमंडळात कधी चर्चाच झाली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी दिलेल्या निकालानंतर काँग्रेसचा खोटारडेपणा उघडा पडला आहे. तो झाकण्यासाठी काँग्रेसने हा प्रकार केल्याचा पलटवार पर्रिकरांनी केला आहे.