नवी दिल्ली : काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेल्या प्रख्यात अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं सदस्यत्‍व स्‍वीकारलं.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मौसमी चॅटर्जी यांचा चेहरा भाजपला फायदेशीर ठरु शकतो. 2004 साली मौसमी चॅटर्जी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पश्चिम बंगालमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र कोलकाता उत्तर पूर्व या मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

मौसमी चॅटर्जी बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी 'बालिका वधू' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं होतं. तर शक्ती सामंता दिग्दर्शित 'अनुराग' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. अमिताभ बच्चन-दीपिका पदुकोण यांच्या 'पिकू' चित्रपटातही त्या झळकल्या होत्या.

मौसमी चॅटर्जी यांचा जन्म कोलकात्यात झाला. त्यांचे वडील प्राणतोष चटोपाध्याय हे लष्करात होते. त्यांचा विवाह प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांचे सुपुत्र जयंत मुखर्जी यांच्याशी झाला. त्यांना पायल आणि मेघा अशा दोन मुली आहेत.

कोमात गेलेली कन्या पायल सिन्हाची जावयाने भेट घेऊ न दिल्याचा आरोप करत मौसमी चॅटर्जींनी काही दिवसांपूर्वी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर मौसमी यांना कन्येशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रं पोहचवण्याचे आदेश कोर्टाने जावई डिकी सिन्हा यांना दिले होते.