मुंबई : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. सामान्य नागरिकांसह, नेते, सेलिब्रेटी आणि खेळाडूंनीदेखील याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेदेखील याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.


विराटने त्याचे मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्याने ट्वीट केले आहे की, हैदराबादमध्ये जी घटना घडली ती अत्यंत लज्जास्पद आहे. पण आता खूप झालं, डोक्यावरुन पाणी चाललंय. यापुढे अशा क्रूर घटनांना आळा घालण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी एकत्र यायला हवं. लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा आणि अशा अमानवी प्रवृत्ती संपवायला हव्यात.

प्रकरण काय?
हैदराबादमधील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयात काम करणारी एक महिला डॉक्टर नेहमीप्रमाणे तिचं रुग्णालयातलं आपलं काम संपवून घरी निघाली होती. रस्त्यात तिची दुचाकी पंक्चर झाली. त्यानंतर तिला एका व्यक्तिने गॅरेजपर्यंत लिफ्ट दिली, तसेच तिला सांगितले की, जवळच्याच गॅरेजमध्ये गाडी दुरुस्त करुन देतो. तो तिला गॅरेजजळ घेऊन गेला. गॅरेजजवळ खूप ट्रक ड्रायव्हर्स होते.

गॅरेजजवळ पोहोचल्यानंतर ती तरुणी घाबरली. त्यामुळे तिने तिच्या बहिणीला फोन केला आणि बहिणीला सांगितले की, "काही लोकांनी तिची गाडी ताब्यात घेतली आहे. आम्ही पंक्चर काढून देऊ चल असं तिला म्हणत आहेत, मला टेन्शन आलंय.." एवढं बोलून होईपर्यंत तिचा फोन कट झाला.

फोन कट झाल्यामुळे तिची बहीण घाबरली. तिने आणि तिच्या काही नातेवाईकांनी पीडित तरुणीची शोधाशोध सुरु केली. ती कुठेच सापडली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिचा पूर्णपणे जळलेला मृतदेह मिळाला. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. नराधमांनी तिचा मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जाळला की तिची ओळख फक्त तिच्या स्कार्फ आणि लॉकेटवरुन पटली.

पोलिसांनी सांगितले की, सदर तरुणीचा मृतदेह हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एका पुलाजवळ सापडला. ज्या टोल प्लाझावर ती शेवटची दिसली होती, तिथून हा पूल 25 किलोमीटर दूर आहे. (टोल प्लाझाजवळच गॅरेज आहे, तिथेच तिची गाडी दुरुस्त करुन देतो, असे आरोपींनी तिला सांगितले होते.)


हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, लोकांमध्ये संताप