हैदराबाद : येथील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी चार आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कडक पोलीस बंदोबस्तात आज या आरोपींना शादनगर पोलीस ठाण्याहून चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. या चारही तरुणांवर सामुहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा मुलगा आणि मंत्री के. टी. रामा राव यांनी सांगितले की, या प्रकरणी मी स्वतः लक्ष घालणार आहे.
याप्रकरणी न्यायालयाने चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हवी होती, असे देशभरातील सर्वसामान्यांचे मत आहे. परंतु न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावल्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर डॉक्टर तरुणी ही हैदराबादमधील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयात काम करत होती. ती नेहमीप्रमाणे तिचं रुग्णालयातलं आपलं काम संपवून घरी निघाली होती. रस्त्यात तिची दुचाकी पंक्चर झाली. त्यानंतर तिला एका व्यक्तिने गॅरेजपर्यंत लिफ्ट दिली, तसेच तिला सांगितले की, जवळच्याच गॅरेजमध्ये गाडी दुरुस्त करुन देतो. तो तिला गॅरेजजळ घेऊन गेला.
गॅरेजजवळ खूप ट्रक ड्रायव्हर्स होते. तिने बहिणीला फोन केला आणि बहिणीला सांगितले की, "काही लोकांनी तिची गाडी ताब्यात घेतली आहे. आम्ही पंक्चर काढून देऊ चल असं तिला म्हणत आहेत, मला टेन्शन आलंय.." एवढं बोलून होईपर्यंत तिचा फोन कट झाला.
फोन कट झाल्यामुळे तिची बहीण घाबरली. तिने आणि तिच्या काही नातेवाईकांनी पीडित तरुणीची शोधाशोध सुरु केली. ती कुठेच सापडली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिचा पूर्णपणे जळलेला मृतदेह मिळाला. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. नराधमांनी तिचा मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जाळला की तिची ओळख फक्त तिच्या स्कार्फ आणि लॉकेटवरुन पटली.
पोलिसांनी सांगितले की, सदर तरुणीचा मृतदेह हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एका पुलाजवळ सापडला. ज्या टोल प्लाझावर ती शेवटची दिसली होती, तिथून हा पूल 25 किलोमीटर दूर आहे. (टोल प्लाझाजवळच गॅरेज आहे, तिथेच तिची गाडी दुरुस्त करुन देतो, असे आरोपींनी तिला सांगितले होते.)
हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, लोकांमध्ये संताप
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
30 Nov 2019 07:36 PM (IST)
हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणातील चारही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -