मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप- 100 मध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत पहिल्या 100 स्थान मिळवणारा विराट एकमेव क्रिकेटर आहे. जून 2018 ते जून 2019 पर्यंत विराटची कमाई 7 कोटींनी वाढून 173 कोटींवर पोहोचली आहे. मात्र तरीही विराट 83 स्थानावरून 100 व्या स्थानावर पोहोचला आहे.


या यादीत अर्जेंटिनाचा फुलबॉलपटू लियोनेल मेसी अव्वल स्थानी आहे. मेसीने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला पछाडून पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. लियोनेल मेसीची गेल्यावर्षीची कमाई 881.72 कोटी एवढी होती. तर रोनाल्डोने गेल्यावर्षी 756.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


या यादीतील एकमेव क्रिकेटर विराट कोहली आणि मेसीच्या कमाईची तुलना केली, तर मेसीची कमाई विराटच्या पाच पटीनं जास्त आहे. फोर्ब्सच्या कमाईमध्ये खेळाडूंचा वार्षिक पगार, टुर्नामेंटमधील जिंकलेली रक्कम, जाहिराती इत्यादींचा समावेश असतो.


एकमेव महिला खेळाडू


टेनिसपटू सेरेना विलियम्स या यादीत टॉप 100 मध्ये एकमेव महिला खेळाडू आहे. गेल्या वर्षी सेरेनाची कमाई 202.5 कोटी होती. टेनिसपटूमध्ये रॉजर फेडरर 647 कोटींच्या कमाईसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे.


या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे या यादीत पहिल्या तीन स्थानावर फुटबॉलपटू आहेत. लियोनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार हे खेळाडू टॉप-3 मध्ये आहेत.


VIDEO | देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट