मुंबई : अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून अवघ्या 630 किमी दूर आहे. मुंबईच्या किनारपट्टीला वायू वादळाचा धोका नाही. तरीही मच्छिमारांनी आज आणि उद्या खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गुजरातमध्ये हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तेथे हाय अलर्ट जारी केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित स्थानी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


वायू चक्रीवादळ सध्या किनारपट्टीपासून 630 किमी अंतरावर असून येत्या 12 तासाच हे वादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरामध्ये कच्छपासून दक्षिण गुजरातमधील समूची तटरेखा येथे हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिली.


ओदिशाला फेनी वादळाचा मोठा तडाखा बसला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्यावेळी ओदिशामध्ये काय उपाययोजना करण्याची आल्या होत्या, याच्या माहितीसाठी गुजरातमधील संबधित अधिकारी ओदिशा सरकारच्या संपर्कात आहेत.


कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द


वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री विविध ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली.


13 आणि 14 तारीख आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही सेना, एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि इतर विभागांकडून मदत मागितली आहे. जीवितहानी टाळण्यासाठी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे, अशी माहिती विजय रुपाणी यांनी दिली.