चेन्नई : तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलंय तर कित्येक ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळली आहेत. एनडीआरएफची टीम तामिळनाडूमध्ये पोहोचली असून बचाव कार्य जोरात सुरु आहे. त्यातच चेन्नईतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चेन्नईतील एक महिला पोलीस इन्स्पेक्टर राजेश्वरी (Inspector Rajeshwari) यांनी एक बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला आपल्या खांद्यावर उचलून ऑटोपर्यंत नेलं आणि रुग्णालयात पाठवलं. राजेश्वरींचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्या साहसाला आज संपूर्ण देश सलाम करतोय.  (Inspector Rajeshwari Carries Unconscious Man On Shoulders).


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की इन्स्पेक्टर राजेश्वरी या रस्त्यावर पडलेली झाडं बाजूला करत आहेत. एका ठिकाणी एक व्यक्ती ही बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं लक्षात आल्यानंतर इन्स्पेक्टर राजेश्वरी यांनी त्या व्यक्तीला थेट आपल्या खांद्यावर उचलून घेतलं. त्यानंतर त्या व्यक्तीला घेऊन तशाच ऑटोपर्यंत चालत जातात आणि त्याला ऑटोमध्ये ठेवतात. सोबतच्या लोकांना बेशुद्धावस्थेतील त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करायला सांगतात. 


या व्हिडीओमध्ये दिसतंय की इन्स्पेक्टर राजेश्वरी यांच्या पायात शूज किंवा चप्पल नाही. तरीही त्या बेशुद्ध व्यक्तीला घेऊन बरंच लांब चालत जातात. त्या अवस्थेतही इन्स्पेक्टर राजेश्वरी या त्यांच्या सहकार्यांना बचाव कार्यासंबंधी काही सूचना करत आहेत. 


 






इन्स्पेक्टर राजेश्वरी या चेन्नईतील चेतराम पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून इन्स्पेक्टर राजेश्वरी याच खऱ्या सिंघम असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. इन्स्पेक्टर राजेश्वरी यांचं हे काम म्हणजे मानवतावादाचं सर्वोत्तम उदाहरण आहे असंही अनेकांनी म्हटलंय. त्यांचं हे काम म्हणजे निस्वार्थी कार्य आहे, त्या कौतुकास पात्र आहेत. 


एका महिलेने जर आधार द्यायचा ठरवलं तर तिचा खांदा किती ताकतवान असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे इन्स्पेक्टर राजेश्वरी. इन्स्पेक्टर राजेश्वरींना खऱ्या अर्थानं देश सलाम करत आहे. 


संबंधित बातम्या :