मुंबई : लग्न समारंभात नाचणं ही सामान्य बाब आहे, पण त्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होणं मोठी गोष्ट आहे. मागील दोन दिवसांपासून एका 46 वर्षांच्या काकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


गोविंदा आणि निलम यांच्या 'खुदगर्ज' (1987) चित्रपटातलं 'दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से' या गाण्यावर डान्स करणारे हे काका रातोरात लोकप्रिय झाले आहेत. गोविंदाची डान्सिंग स्टाईल अगदी हुबेहूब करुन दाखवणाऱ्या या काकांचा जोश, त्यांची एनर्जी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी..

'आप के आ जाने से..' काकांचा गोविंदा स्टाईल भन्नाट डान्स

व्हायरल झालेला पहिला व्हिडीओ



कोण आहेत नाचणारे काका?

एका लग्नातील जबरदस्त डान्समुळे सोशल मीडिया सेंसेशन बनलेल्या या काकांचा पत्ता लागला आहे. भन्नाट डान्स करणाऱ्या या काकांचं नाव संजीव श्रीवास्तव असून ते मध्य प्रदेशच्या विदिशात राहतात. डब्बू अंकल म्हणून त्यांना ओळखलं जातं. ग्वाल्हेरमध्ये 12 मे रोजी मेहुण्याच्या लग्नाच्या संगीतातील हा डान्सचा व्हिडीओ आहे.

नागपूर विद्यापीठ आणि नागपूरच्याच प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेले संजीव श्रीवास्तव भाभा इंजिनिअरिंग रिचर्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात.

मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदाकडून डान्सची प्रेरणा मिळाली. पण गोविंदाच्या गाण्यावर जास्त डान्स केले. कॉलेजमध्ये असताना स्टेजवर डान्स करायचो. पण 1998 मध्ये डान्स करणं बंद केलं होतं, असं संजीव श्रीवास्तव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. सध्याच्या काळात हृतिक रोशनचा डान्स आवडतो, तो कम्प्लिट डान्सर आहे. त्याच्या 'कहो ना प्यार है' गाण्याच्या स्टेपवर डान्स केला होता, असंही ते म्हणाले.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतत कॉल येत असल्याचंही संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं.

दुसरा व्हिडीओही व्हायरल!

पहिला व्हिडीओ व्हायरल होताच, काकांच्या डान्सचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाला आहे. हा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.




त्यांच्या डान्सचा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. प्रत्येक जण काकांच्या डान्स स्टेप्सचं कौतुक करत आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री रवीना टंडन, दिव्या दत्ता, संध्या मेनन यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.