शिमला : शिमलामधील पाणी संकट पाहता आता स्थानिक नागरिक पर्यटकांना शिमल्यात न येण्याची विनंती करत आहेत. पर्यटकांनी शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी जावं, कारण इथे पाण्याचा फारच तुटवडा आहे, अशाप्रकारच्या पोस्ट नागरिक सोशल मीडियावर करत आहेत.


"शिमलामध्ये गरजेपुरतं लागणारं पाणीही उपलब्ध नाही. आंघोळीसाठीचं पाणी सोडाच पण पिण्यासाठीही आवश्यक पाणी मिळत नाही. शिमल्यात आम्हाला पाणी नाही. कृपया शिमल्यात न येता दुसऱ्या पर्यटन स्थळाला जावं," असं एकाने लिहिलं आहे.

25 हजार नागरिकांच्या हिशेबाने शिमला शहर वसवण्यात आलं होतं. शिमला नगरपरिषदेनुसार, शहराची लोकसंख्या आता 1.72 लाखांवर पोहोचली आहे. याशिवाय उन्हाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त असते. पर्यटकांची संख्या वाढल्याने इथे दरदिवशी 45 एमएलडी (मिलियन लिटर्स पर डे) पाण्याची मागणी वाढते.

"सरकारने नियमावली जारी करुन शिमला न येण्यास सांगायला हवं. इथल्या स्थानिकांना पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत इथे येऊन पर्यटकांनी आणखी अडचणी वाढवू नये," असा सल्ला एकाने दिला आहे.

पाणी संकटाचा सामना करत असलेल्या शिमलामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल वगळता सर्व व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींना टँकरने पाणीपुरवठा करण्यावर बंदी घातली आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत इमारती तसंच इतर बांधकाम बंद राहिल. याशिवाय शहरातील कार वॉशिंग सेंटरवरही बंदी घातली आहे.