नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ट्वीट कमालीचं व्हायरल होत आहे. या ट्वीटमधून मोदींनी सैन्यदलासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या ट्वीटमध्ये, आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे आपल्या भारतीय सैन्य दलाच्या कमजोरीमुळे होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावरुन व्हायरल होणाऱ्या या ट्वीटवरुन राजकारणही चांगलंच तापलं आहे. पंतप्रधानांचे हे ट्वीट तीन वर्षापूर्वी 2013 सालातील असल्याचे सांगण्यात येत असून त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार सत्तेत होतं. त्यामुळे या ट्वीटचा आधार घेऊन तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण केल्या जाणाऱ्या समस्यांबाबत सैन्यदलाला दोषी धरल्याचा दावा करण्यात येत आहे.
या ट्वीटचाच आधार घेऊन आम आदमी पक्षानेही राजकारण तापवलं असून, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. हे ट्वीट संजय सिंह यांनी पोस्ट करुन पंतप्रधानांचे सैन्य दलाबाबत आजही हेच मत आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधानांना तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी या प्रतिक्रीयेशी सहमत आहेत का? असा टोलाही लगावला आहे.
व्हायरल होणाऱ्या या ट्वीटची एबीपी न्यूजने पडताळणी केली. यावेळी पंतप्रधानांनी तीन वर्षापूर्वी हरियाणातील रेवाजमध्ये झालेल्या सभेतील तो भाषणाचा भाग असल्याचे समोर आले. या सभेच्या दोनच दिवस आधी नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. 13 सप्टेंबर 2013 रोजी मोदींची पंतप्रधान पदासाठी घोषणा झाल्यानंतर 15 सप्टेंबर रोजी माजी सैनिकांच्या सभेत माजी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना 'वन रँक वन पेंशन' चं आश्वासन दिलं होतं.
त्यावेळच्या भाषणात मोदींनी शेजारील राष्ट्रांकडून ज्या काही समस्या निर्माण केल्या जात आहेत, त्याला सैन्य दल जबाबदार नाही, तर केंद्रातील यूपीए सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी कधीही सैन्यदलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत. पण संजय सिंहनी यावरुन राजकारण करताना मोदींचे ते भाषण नीट पाहिलं नसल्याचं दिसून येतं. कारण त्या भाषणातच संजय सिंह यांच्या प्रश्नाचे उत्तर होतं. पण सिंह यांनी या ट्वीटला अशा पद्धतीने ट्वीट केलं, जसे की मोदींनी सैन्य दलावरच प्रश्न उपस्थित केले होते.
त्यामुळे एबीपी न्यूजच्या या पडताळणीत व्हायरल होणारे हे ट्वीट चुकीचं असल्याचं समोर आलं आहे.