मुंबई: बिहारचा सिंघम अशी ओळख असलेल्या मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात येणार आहे.


शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी महाराष्ट्रात नियुक्तीची विनंती केली होती. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी लांडे यांना महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहे.

2006च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक आहे. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळं ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे.

बदलीसाठी अर्ज

पाटणा इथं डॅशिंग काम करून, एसपी शिवदीप लांडे आख्ख्या बिहारच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मात्र शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजेच महाराष्ट्रात परतण्यासाठी अर्ज केला होता.

या अर्जाची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत, गृहविभागाला अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

विजय शिवतारेंचे जावई

आयपीएस शिवदीप लांडे यांनी या अर्जाबाबत बोलण्यास नकार दिला होता. मात्र त्यांचे सासरे आणि महाराष्ट्रातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता.

“शिवदीप लांडे यांनी बिहारच्या गुन्हेगारी विश्वात दहशत बसवली आहे. अशा अधिकाऱ्याची महाराष्ट्राला गरज आहे. शिवदीपने महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण किंवा दहशतवादविरोधी पथकात काम करावं अशी आमची इच्छा आहे” असं शिवतारे म्हणाले होते.

शिवतारे हे शिवसेना नेते आहेत. त्यांना आपल्या जावयाचा अभिमान आहे. लांडेंने केलेल्या कारवाईंचे ते अनेकवेळा दाखले देत असतात.

बक्कळ अनुभव

शिवदीप लांडे यांनी यापूर्वी बिहारमधील अरारिया, पूर्णिया आणि जमलपूरमध्येही पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कामाचा बक्कळ अनुभव आहे.

त्यामुळे बदलीसाठी शिवदीप पात्र आहेत, असं शिवतारे यांचा दावा आहे. याशिवाय सर्व केंद्र सरकारी सेवांमधील अधिकाऱ्यांना आपल्या राज्यात परतण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचीही परवानगी असते, असंही शिवतारे म्हणाले.

कोण आहेत शिवदीप लांडे?

40 वर्षीय शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीप यांनी  इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी शिक्षण घेतलं आहे.

29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी इथं शिवदीप यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. शिवदीप यांना एक मोठी बहिण आणि लहान भाऊ आहे.

शिवदीप यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

यानंतर शिवदीप यांनी नोकरीनिमित्त थेट मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी अनेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. मात्र समाजाप्रती काही करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी यूपीएससीची तयारी केली.

यूपीएससीमध्ये पास झालेल्या शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती. पण रँक न मिळल्याने त्यांना आयपीएस स्वीकारावं लागलं.

पहिली पोस्टिंग

शिवदीप लांडे यांची प्रशिणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून बिहारच्या मुंगेरजवळच्या जमालपूर इथं नियुक्ती झाली होती. हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जात होता.

पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून या भागाला ओळखलं जात होतं. इथेच 2005 साली नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक सुरेंद्र बाबूंची हत्या केली होती. त्यामुळे पोलीस या ठिकाणी जाण्यास घाबरत होते.

मात्र पहिल्याच नियुक्तीत शिवदीप यांनी आपल्या कामाची छाप पाडून, स्थानिकांचा विश्वास मिळवला. प्रत्येक आठवड्यात ते या परिसरात जाऊन स्थानिकांच्या गाठीभेटी घेत. त्यामुळे स्थानिकांचं त्यांना सहकार्य मिळालं. त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यात झाली.

शिवदीप यांनी बिहारमध्ये अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली.  धडक कारवाई रोखण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यात आला. त्यांची बदलीही करण्यात आली. मात्र शिवदीप यांच्या बदलीविरोधात बिहारी जनता रस्त्यावर उतरली होती.