व्हायरल सत्य : गुजरातमध्ये राहुल गांधींच्या रॅलीत 'पेड गर्दी'?
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2017 11:00 PM (IST)
रॅलीतील गर्दी पैसे देऊन जमवली असल्याचा दावा व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात येत आहे.
अहमदाबाद : गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय हालचाली वेगात सुरु आहे. आरोप-प्रत्योराप रोज ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. यादरम्यानच सोशल मीडियावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये या रॅलीतील गर्दी पैसे देऊन जमवली असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओचं सत्य काय? 23 ऑक्टोबर रोजी गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये राहुल गांधींची रॅली होती. याच रॅलीतील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या रॅलीतील काँग्रेस झिंदाबादच्या घोषणांमागे पैशांचा आवाज होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रॅलीत पेड गर्दी जमवण्यात आली? एबीपी न्यूजने या व्हिडिओची पडताळणी केली. हा व्हिडिओ 2 मार्च 2017 रोजी इंटरनेटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. गांधीनगरच्या रॅलीतील नव्हे, तर मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये झालेल्या रॅलीतील हा व्हिडिओ आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या गुजरातमधील रॅलीत पैसे देऊन गर्दी जमवली हा दावा खोटा ठरला आहे. पाहा व्हिडिओ :