सुरत : गुजरात एटीएसने एक मोठा कट उधळला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात अहमदाबादमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


गुजरात एटीएसने सुरतमधून या दोन संशयितांना ताब्यात घेतलं. ही दोघं गुजरात निवडणुकीच्या काळात अहमदाबादमध्ये घातपात घडवण्याची तयारी करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. हे दोन संशयित सध्या गुजरात एटीएसच्या ताब्यात आहेत.

https://twitter.com/ANI/status/923199699938566146

निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुजरात एटीएसने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.

गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम

दोन टप्प्यात गुजरातच्या निवडणुका पार पडणार आहेत. 89 विधानसभा मतदारसंघात 9 डिसेंबर आणि 93 मतदारसंघात 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी निकाल लागेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा केली. गुजरातमध्ये या क्षणापासून आचारसंहिता लागू झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ए के ज्योती यांनी सांगितलं. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 22 जानेवारीला संपणार आहे.

गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून 50 हजार 128 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यापैकी 102 पोलिंग बुथवर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. सर्व केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांवर व्हिडीओ रेकॉर्डिंगही होणार आहे.

तसंच गुजरातमध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत कमाल 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निश्चित केल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.