अहमदाबाद : निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या एक घटनेने गुजरातमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ती घटना आहे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्यात हॉटेलमध्ये झालेल्या भेटीची.


राहुल गांधींना आपण भेटलो नाही, असा दावा हार्दिक पटेलने केला. मात्र एबीपी न्यूजच्या हाती असे पुरावे लागले आहेत, ज्याने हार्दिक पटेलच्या दाव्याची पोलखोल झाली आहे.

हार्दिक पटेल गेलेल्या रुममधून राहुल गांधी बाहेर पडले

अहमदाबादच्या ताज उमेद हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी न्यूजच्या हाती लागलं आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, हॉटेलच्या रुम नंबर 224 मध्ये हार्दिक पटेल जात आहे आणि काही वेळानंतर याच रुममधून राहुल गांधी बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र हार्दिक पटेल आणि राहुल गांधी या फोटोंमध्ये सोबत असल्याचं कुठेही दिसत नाही.

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हार्दिक पटेलची पहिली प्रतिक्रिया

एबीपी न्यूजने हा खुलासा केल्यानंतर हार्दिक पटेलने थेट उत्तर देण्याऐवजी भाजपवर निशाणा साधला आहे. ट्विटरवर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली. ''हजारो लिटर दारु भाजपच्या निगराणीत सीमेवरुन गुजरातमध्ये येते. तेव्हा हे सीसीटीव्ही कुठे जातात?'' असा सवाल हार्दिक पटेलने केला.

https://twitter.com/HardikPatel_/status/923040534645571584

''राहुल गांधींना जाहीरपणे भेटेन''

यापूर्वीही एबीपी न्यूजशी बोलताना हार्दिक पटेलने या भेटीच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. ''त्या हॉटेलमध्ये काही गुन्हा झालेला नाही किंवा काही वाद नाही, मग सीसीटीव्ही फुटेज लीक कसं झालं, असं हार्दिक पटेल म्हणाला होता. मी राहुल गांधींना भेटलो नाही, पण भेटलो तरी कुणाला काय हरकत असावी? मी त्यांना त्यांच्या पुढच्या दौऱ्यात भेटणार आणि आणि जाहीरपणे भेटणार आहे'', असं हार्दिक पटेलने सांगितलं.

काँग्रेसचंही संभ्रम निर्माण करणारं उत्तर

एबीपी न्यूजने या प्रकरणावर काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गहलोत यांनाही प्रश्न विचारला. मात्र अशोक गहलोत यांनी या प्रश्नाला थेट नकारही दिला नाही किंवा ठामपणे सांगितलंही नाही. प्रश्न राहुल गांधींच्या भेटीचा आहे, तर त्यांनाच विचारा, असं उत्तर अशोक गहलोत यांनी दिलं होतं.

पाहा व्हिडिओ :