मुंबई : काश्मिरच्या लाल चौकात जेव्हा सन्नाटा होता.. तेव्हा एका महिलेच्या 'भारत माता की जय'च्या जयघोषानं लाल चौकही थरारला. 15 ऑगस्ट रोजी लाल चौकात शुकशुकाट होता, पण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी एक महिला थेट श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचली.


खरं तर लाल चौकात कर्फ्यु लागला होता. पण त्या कर्फ्युला झुगारत तिने थेट घोषणाबाजी सुरु केली.

ओ गाड़ी ला गाड़ी ला
आप भी भारत के हैं
आप भारत के हैं
भारत माता की जय बोलना हमारा फर्ज है

45 सेकंदाच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ माजवली.

'वंदे मातरम्'चा जयघोष करणारी कोण आहे ही महिला? हा खरंच श्रीनगरचा लाल चौक आहे का? खरंच हा व्हिडिओ 15 ऑगस्टचा आहे का?

याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा 'एबीपी माझा'ने प्रयत्न केला. तेव्हा हा लाल चौकच असल्याचं आमच्या
पडताळणीत लक्षात आलं.

श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे


1948 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी याच लाल चौकात तिरंगा फडकवला होता. काश्मीर प्रश्न चिघळल्यानंतर 1989 पासून लाल चौकात स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताकदिनी सुरक्षा कडेकोट असते. 26 जानेवारी 1992 रोजी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी लाल चौकातल्या घंटा घरावर तिरंगा फडकवला होता.

सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनीही लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पण या लोकांप्रमाणेच ही महिला 15 ऑगस्टला लाल चौकात पोहोचली होती का?

याचंच उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा या महिलेचं नाव सुनिता अरोरा असल्याचं समोर आलं. आमचे प्रतिनिधी अजय बाचलू त्यांच्या घरी पोहोचले. सुनिता या मूळच्या काश्मिरीच आहेत. शिवाय पेशाने त्या पत्रकार आहेत.

सुनिता यांना तिरंगा तर फडकवता आला नाही. त्यामुळे त्यांनी फक्त घोषणाबाजी केली आणि पोलिसांनी त्यांना
ताब्यात घेतलं. आपल्या मातृभूमीवर तिरंगा फडकवता न आल्याचं शल्य सुनिता यांना आहे. 'माझा'च्या पडताळणीमध्ये लाल चौकातला हा व्हिडिओ खरा ठरला आहे.

पाहा व्हिडिओ :