सोशल मीडियावरचा दावा नंबर 1

राजधानी दिल्लीच्या शेजारीच असलेल्या गुरुग्राममध्ये दहशत आहे केस कापणाऱ्या मांजरीची. हातात आपल्या बायकोचे कापलेले केस घेऊन उभा असलेल्या इसमाचा दावा आहे, की रात्री झोपेत असताना आपल्या पत्नीचे केस कुणीतरी कापले.

सोशल मीडियावरचा दावा नंबर 2

दिल्लीच्या कांगनहेडी गावातही असाच प्रकार समोर आला. एका वृद्ध महिलेचे केस रात्रीच्या अंधारात कुणीतरी कापून टाकले.

सोशल मीडियावरचा दावा नंबर 3

हरियाणाच्या निझामपूरमध्येही एका महिलेचे केस कुणीतरी कापून टाकल्याचा दावा केला जात आहे. या तिन्ही घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही तर हरियाणा आणि
दिल्लीतल्या अनेक गावांमध्ये असे प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हा प्रकार एक मांजर करत असल्याचा दावाही केला जात आहे. या मांजरीचं रुपांतर एका महिलेत होत असल्याचंही गावकरी सांगतात.



अशा घटनांमुळे या भागातल्या महिलांनी आता वेण्या घालणंच सोडून दिलं आहे. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.

पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात. महिलांचे केस कापणारा आहे तरी कोण? ती महिला आहे? पुरुष आहे? की प्राणी? केस कापण्यामागचा उद्देश काय आहे? गावांमध्ये दहशत पसरवली जात आहे का? पोलिस अजून काय करत आहेत?

पहिल्या दाव्याची पडताळणी

केस कापणारी महिला मांजर होऊन आली आणि नंतर पुन्हा महिला झाल्याचा दावा, केस कापल्या गेलेल्या महिलेचा पती ओम प्रकाशने केला. पण त्याच्या पत्नीचा दावा मात्र वेगळाच होता. संतराच्या मते तिनं काहीच पाहिलं नाही. म्हणजे दोघांच्याही दाव्यामध्ये तफावत स्पष्ट होती.



दुसऱ्या दाव्याची पडताळणी

कांगनहेडीतल्या घटनेची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहोचलो, तर तिथे जणू कर्फ्यु लागला होता. घरासमोर
भूतप्रेताची बाधा टाळण्यासाठी लिंबाचा पाला आणि हाताचे ठसे उमटवले होते. या गावात तर एक दोन नाही, तर तीन महिलांचे केस कापले गेले होते.

पण त्याच गावामध्ये आम्हाला एक सीसीटीव्ही दिसून आला. जर अशा घटना खरच घडल्या असतील, तर त्यात काही ना काही रेकॉर्ड झालेच असेल. त्याचीच पुष्टी करण्यासाठी आम्ही थेट पोलीस ठाणं गाठलं आणि तिथेच या
व्हिडिओमागचं सत्य समोर आलं.

सीसीटीव्हीमध्ये पळ काढणारे ही तीन जण सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांनीच गुंगीचं औषध देऊन घरांमध्ये लूटमार करुन दहशत पसरवण्यासाठी महिलांचे केस कापल्याचा संशय आहे. त्यामुळे ही एखादी घटना भुता-खेतांची नसून, लूटमारीचा एक भाग असल्याचा संशय आहे. हेच आहे माझाच्या पडताळणीनंतरचं व्हायरल सत्य.