बंगळुरु : पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर अनेकांनी जुन्या नोटा खपवण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे. अशाच जुना नोटा संपवण्यासाठी कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जवाटप केल्याची चर्चा पिकली. मात्र या घटनेमागील व्हायरल सत्य आता उजेडात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याबाबत घोषणा करण्यापूर्वीच (8 नोव्हेंबर) या नेत्यांनी गरिबांसाठी कर्ज मेळाव्याचं आयोजन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जुन्या नोटा खपवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवल्याच्या 'व्हायरल' बातमीत काहीच तथ्य नसल्याचं उघड झालं आहे. सोमवारी 7 तारखेला हे कर्जवाटप झालं असून 8 तारखेच्या पेपरात ही बातमी छापून आल्याची माहिती आहे.
फोटोमध्ये बांगरपेटचे आमदार असलेले काँग्रेसचे नेते एस एन नारायण स्वामी, जिल्हा पंचायत सदस्य महेश आणि बँकेचे अध्यक्ष ब्यालहल्ली गोविंद गौडा शेतकऱ्यांना रांगेत नोटांची बंडलं देताना दिसत आहेत. या नेत्यांनी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात प्रत्येकी 3-3 लाखांचं कर्जवाटप केल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर आणण्यासाठी चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर देशभरात आपल्याकडच्या नोटा बदलून नव्या नोटा घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. काळ्या पैशाला पांढरा पैसा करण्यासाठी अनेकांकडून नामी शक्कल लढवली जात आहे. मात्र कर्नाटकच्या नेत्यांनीही अशीच युक्ती लढवल्याचं वृत्त खोटं आहे.