नवी दिल्ली: आजच्या टेक्नोसॅव्ही युगात सोशल मीडियावर फोटो, मेसेज किंवा कोणतीही सरकारी नोटीस तत्काळ व्हायरल होते. सध्या रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीने अशाच प्रकारचा एक मेसेज कमालीचा व्हायरल होत आहे. यामध्ये नोटांच्या सीरीजचे नंबर देऊन, दोन हजार कोटींच्या बनावट नोटा बाजारात उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.


काय आहे दावा

सध्या सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होतो आहे, त्यात बँक ऑफ महाराष्ट्राचे नाव आणि लोगो वापरण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे एक हजारांच्या नोटा जास्त प्रमाणात आहेत, त्यांना हा मेसेज पाहून धक्का बसत आहे. कारण या मेसेजमधून तब्बल दोन हजार कोटींच्या बनावट नोटा बाजारात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचाही संदर्भ देण्यात आला आहे.

महाराष्ट्र बँकेच्या नावाने तो मेसेज...

या मेसेजमध्ये, ''रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या सर्क्युलरनुसार, ज्या एक हजार रुपयांच्या नोटांची सीरीयल नंबर 2AQ किंवा 8AC आहे, त्या हताळू नयेत. कारण सध्या देशात 2 हजार कोटी बनावट नोटा आल्या आहेत.''

रिजर्व्ह बँकेच्या सर्क्युलरचा आधार

या मेसेजची एबीपी माझाच्या टीमने पडताळणी केली असता, 2009 मध्ये रिजर्व्ह बँकेच्या वतीने एक सर्क्युलर काढून त्याच सीरीजमधील नंबर संदर्भात सर्व बँकांना सावध केले होते. तसेच या सीरीजच्या 345 बानावट नोटा मिळाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या सीरीजच्या नोटा तुम्हाला प्राप्त झाल्यास त्याची पडताळणी करावी, असं म्हटलं होतं.

रिजर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण

एबीपी न्यूजने जेव्हा रिजर्व्ह बँकेचे प्रवक्त्यांना या संदर्भात विचारले असता, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या सीरीजमधील बनावट नोटा मिळाल्या, तर त्यासंदर्भात बँकांना सूचना दिल्या जातात. बँकांना या सीरीजमधील नोटांची सत्यता पडताळण्याच्या सूचना दिल्या जातात. अशा प्रकारच्या बनावट नोटा मिळाल्याच तर त्या तत्काळ पोलिसांकडे जमा कराव्यात असेही सांगितले जाते. बँकांना त्या सीरीजच्या नोटा घेण्यास कोणत्याही प्रकारची मनाई केली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



या सीरीज संदर्भातील एक सर्क्युलर प्रकाशित करण्यात आले होते, हे पडताळणी दरम्यान आढळले. वास्तविक हे प्रकरण सात वर्षांपूर्वीचे असून यामध्ये 345 बनावट नोटा मिळाल्याचे वृत्त होते. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये जो आकडा आणि माहिती सांगण्यात आली आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.