नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यास शिवसेनेसोबत राहणं कठीण आहे, त्यामुळे एका मिनिटात सरकार पडेल, असा अंदाज अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. आमदार रवी राणा यांनी दिल्लीत एबीपी माझाशी खास बातचित केली.


मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी अपक्ष आमदार रवी राणा मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांना पटवलं तर सहा अपक्ष एकाच वेळी राजीनामा देतील, असा इशारा रवी राणा यांनी याआधीच दिला आहे.

शिवाय, मुख्यमंत्री हटवण्याची चर्चा कुठून सुरु झाली माहिती नाही, पण गरज पडल्यास भाजपच्या हायकमांडनाही भेटून या तीव्र भावना कळवू, असेही रावी राणा यांनी सांगितले.

“महाराष्ट्रातलं युतीचं सरकार टिकून आहे ते केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. त्यामुळे मुख्यमंत्री हटवण्याचे कारस्थान कोणाचा आहे माहिती नाही, कदाचित पक्षातले लोक सुद्धा असू शकतील. पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेमागे ठाम आहोत.”, असे आमदार रवी राणा म्हणाले.

तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना आमदारांच जास्त प्रेम देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, असेही रवी राणा म्हणाले.

दरम्यान, दुसरीकडे अपक्ष आमदारांमध्येच दुफळी पाहायला मिळते आहे. कारम अपक्ष आमदार शिरीष चौधरी आणि गणपतराव गायकवाड यांनी स्पष्ट केलेय की, “आमचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे, मात्र रवी राणा हे काही अपक्ष आमदारांचे नेते नाहीत.”

त्यामुळे अपक्ष आमदारांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा असल्याचे दिसून येते आहेच, मात्र रवी राणा ज्याप्रकारे अपक्ष आमदारांचं नेते असल्याचे भासवत आहेत, ते चित्र फसवं असल्याचे इतर आमदारांनी दाखवून दिले आहे.