लंडन : भारतीय बँकांना नऊ हजार कोटींचा चुना लावणारा विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मल्ल्याची मुजोरी दिसून आली.

एएनआयच्या प्रतिनिधीने मल्ल्याला प्रश्नही विचारला की, भारतात कधी परतणार? याचा निर्णय न्यायाधीश घेतील, असं उत्तर मल्ल्याने एएनआयच्या प्रतिनिधीला दिलं. भारताकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तो अद्याप इंग्लंडमध्येच आहे.


विजय मल्ल्याचं क्रिकेटप्रेम याआधीही पाहिलं गेलं आहे. याआधी 2016मध्ये मल्ल्या ओव्हलच्या याच मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी मैदानात प्रेक्षकांनी मल्ल्याविरोधात 'चोर चोर..' अशी घोषणाबाजी केली होती.

विजय मल्ल्यावर भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आणि मनी लाँन्ड्रीगचा आरोप आहे. भारताकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.