पणजी : महिलांची अंतर्वस्त्र आणि किरकोळ रक्कम चोरणाऱ्या मानसिक विकृताला पणजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तुळशीदास शिरोडकर असं या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याच्या अटकेमुळे गेल्या दोन महिन्यापासून गोव्यातील ताळगाव टेकडीवरील उच्चभ्रू होरायझन कॉम्पेक्समध्ये दहशहतीखाली वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


अंगाला तेल लावून केवळ अंडरवेअर घालणारा हा आरोपी मध्यरात्री मध्यरात्री महिलांच्या खोलीत शिरुन विकृत चाळे करायचा. खिडकीतून घरात घुसल्यानंतर तो महिलांची अंतर्वस्त्रे घेऊन पळून जायचा. मौल्यवान वस्तूंना त्याने हात लावत नसला तरी काहीवेळा किरकोळ रक्कम त्याने लांबवली होती.

या विकृतामुळे ताळगावातील उच्चभ्रू वस्तीमधील नागिरक गेल्या दोन महिन्यांपासून काळ्या मानवी आकृतीची धास्तीखाली दिवस काढत होते. काही भाडेकरुंनी तर भीतीने फ्लॅटसुद्धा सोडले होते. यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी अखेर पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली.

त्यांच्या तक्रारीनुसार, हा माणूस रात्री उशिरा 3.30च्या सुमारास ताळगाव टेकडीवर असलेल्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये शिरुन विकृत चाळे करायचा. खिडकीच्या काचा सरकवून तो आत शिरायचा. अंगाला तेल लावलेला हा आरोपी अर्धनग्न अवस्थेत असायचा. झोपलेल्या महिला पाहून तो निघून जायचा. तर काहीवेळा घरातील महिलांची अंतर्वस्त्रे पळवून न्यायचा.

अडवपाल रेसिडेन्सीतील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हा प्रकार एकदा नव्हे तर बऱ्याच वेळा घडला आहे. घरातील लोकांनी त्याला दोन वेळा पाहिले होते. परंतु तो कधीच कोणाच्या हाती लागला नव्हता. तो आल्या मार्गे पुन्हा बाहेर पडून पसार होत असे.

पणजी पोलिसांनी तक्रारीमधील वर्णनानुसार तपास सुरु केला. महिलांची अंतर्वस्त्र आणि किरकोळ रक्कम चोरुन नेणारा मानसिक विकृत असू शकेल याची कल्पना आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे त्या दिशेने फिरवली. त्यात ताळगाव इथल्या 35 वर्षीय तुळशीदास शिरोडकरपर्यंत धागेदोरे सापडले. शेवटच्या घटनेवेळी एक माणूस अंडरवेअरवर पहाटे तीनच्या सुमारास अडवलपालकर रेसिडेंसीमधून बाहेर पडताना एका टॅक्सी चालकाने पाहिले होते. रहिवाशांनी केलेले वर्णन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुळशीदासला त्याच्या घरातून अटक केली असून त्याच्या घरात घटनांशी संबंधित साहित्यही सापडलं आहे.

पणजी पोलिस मनोविकार तज्ज्ञांच्या मदतीने त्याची वैद्यकीय तपासणी करणार असून आज ओळख परेड करुन त्याच्याविरोधात असलेल्या तक्रारी पडताळून पाहणार आहेत. पणजी पोलिसांनी संशयिताला गजाआड केल्यामुळे दोनापावल, ताळगावमधील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.