हवाई दलाच्या कारवाईवेळी जे लोक या संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून होते, त्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचाही समावेश होता. दिल्ली सोडू नका असं दोन दिवसांपूर्वीच भामरे यांना सांगण्यात आलं होतं. ते धुळ्यात असताना त्यांना तातडीने बोलावून दिल्लीत थांबायला सांगितलं गेलं.
कालच्या संपूर्ण कारवाईच्या वेळी तेही वॉर रुममध्ये उपस्थित होते. पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल, हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह जे मोजके लोक या कारवाईचे प्रथम साक्षीदार होते त्यात मराठमोळे भामरेही होते.
दुसरीकडे या संपूर्ण हल्ल्याची माहिती अधिकृतपणे देण्याची जबाबदारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांभाळली. या हल्ल्याचं ब्रीफिंग करताना जे शब्द तोलून-मापून वापरण्यात आले होते. त्यातल्या मुत्सद्देगिरीची सगळीकडे कौतुकास्पद चर्चा होती. ही महत्त्वाची प्रेस ब्रेफिंग तयार करण्यात विजय गोखले यांचाच वाटा होता.
लष्करी कारवाईनंतर अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर ती कूटनीतीचीही योग्य पावलं उचलावी लागतात. आज परराष्ट्र मंत्रालयाने ती जबाबदारी निभावण्यात यश मिळवलं. मागच्या वेळी सर्जिकल स्ट्राइकनंतर लष्कराच्याच अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मात्र यावेळी सीमेपलीकडची कारवाई असल्याने परराष्ट्र मंत्रालयाने हा संदेश द्यावा, असं सीसीएसच्या मीटिंगमध्ये ठरलं.