नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन कर्जगैरव्यवहारप्रकरणी चौकशीला विलंब केल्यामुळे आणि या प्रकरणाच्या चौकशीबाबतची माहिती फोडल्याच्या संशयावरून केंद्रीय अन्वेषण शाखेने (सीबीआय) तपास अधिकाऱ्याची बदली केली आहे. पोलीस अधिक्षक सुधांशू धर मिश्रा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. परंतु सीबीआयकडून या बातमीला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष व्ही. एन. धूत यांच्याविरोधात 22 जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिश्रा यांची सीबीआयच्या रांची येथील आर्थिक गुन्हे कक्षात बदली करण्यात आली आहे. मिश्रा यांच्या बदलीनंतर मोहित गुप्ता यांनी सूत्रे हाती घेतली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान कोणतेही कारण न देता या कर्जगैरव्यवहाराची प्राथमिक चौकशी प्रलंबित ठेवल्याचा तसेच सीबीआयचे छापे आणि त्या संदर्भातील इतर माहिती फोडल्याचा आरोप मिश्रा यांच्यावर सीबीआयने केला आहे.
काय आहे प्रकरण?
वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.
वेणुगोपाल धूत आणि आयसीआसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला ‘घरच्याच’ आयसीआसीआय बँकेने तब्बल 64 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली.