मुंबई : व्हिडीओकॉन कर्जप्रकरणात सीबीआयकडून वेणुगोपाल धूत आणि दीपक कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर मुंबई आणि औरंगाबादमध्ये सीबीआयकडून व्हिडीओकॉन आणि सुप्रीम एनर्जीच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चंदा कोचर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वेणुगोपाल धूत यांच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील आणि नरीमन पॉईंट येथील कार्यालयांमध्ये सध्या सीबीआयची टीम चौकशी करत आहे.
चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी धूत यांच्या व्हिडीओकॉनला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या कर्जाच्या बदल्यात वेणूगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्या नूपॉवरमध्ये 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळेच चंदा कोचर यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच कोचर यांना आयसीआयसीआय बँकेच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले असल्याचे बँकेने स्पष्ट केले होते.
काय आहे प्रकरण?
वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.
वेणुगोपाल धूत आणि आयसीआसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला ‘घरच्याच’ आयसीआसीआय बँकेने तब्बल 64 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली.
व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2019 12:13 PM (IST)
व्हिडीओकॉन कर्जप्रकरणात सीबीआयकडून वेणुगोपाल धूत आणि दीपक कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर मुंबई आणि औरंगाबादमध्ये सीबीआयकडून व्हिडीओकॉन आणि सुप्रीम एनर्जीच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -