अलिगढ : दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या. शिवाय, त्यांना निवडणुकीला उभे राहण्यावरही मनाई घाला, असा सल्ला योगगुरु रामदेवबाबा यांनी लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दिला आहे. शिवाय, दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी शाळा, रुग्णालयाचा लाभ घेऊ देऊ नका तसेच नोकऱ्यांमध्ये स्थान देऊ नका, म्हणजे आपोआपच लोकसंख्या नियंत्रणात येईल, असेही रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. लोकसंख्या नियंत्रणाबाबत रामदेव बाबा यांनी याआधीही अशा प्रकारची विधाने केली होती.
पुढील पंतप्रधान कोण होणार सांगणं कठीण : बाबा रामदेव
योगगुरु बाबा रामदेव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा दिला होता. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाबा रामदेव नरेंद्र मोदींची साथ द्यायला तयार नाहीत. आगामी निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचा पुनरुच्चार योगगुरु रामदेव बाबांनी नुकताच केला होता.
बाबा रामदेव यांच्या भूमिकेनंतर भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. "सध्याची राजकीय परिस्थिती काहीशी विचित्र आहे. त्यामुळे पुढील पंतप्रधान कोण होणार याबाबत आता काहीच बोलू शकत नाही. मी राजकारणावर लक्ष देत नाही. त्यामुळे मी कोणाचा विरोध किंवा समर्थन करत नाही", असं बाबा रामदेव म्हणाले होते. बाबा रामदेवांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
बाबा रामदेव यांनी हिंदू राष्ट्र आणि सांप्रदायिकता यांसारख्या मुद्द्यांवर भाजपवर निशाणा साधत आम्हाला सांप्रदायिक किंवा हिंदू राष्ट्र बनवायचं नाही. आम्ही आध्यात्मिक भारत आणि जग निर्माण करु इच्छितो, असे मत व्यक्त केले होते.
बाबा रामदेव यांनी आगामी निवडणुकीत कोणालाही समर्थन देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ते निवडणुकीत कोणाचाही प्रचार करणार नाहीत. 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला समर्थन दिलं कारण त्यावेळी बिकट परिस्थिती होती, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं.
दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी लाभ देऊ नका : बाबा रामदेव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2019 09:22 AM (IST)
दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी शाळा, रुग्णालयाचा लाभ घेऊ देऊ नका तसेच नोकऱ्यांमध्ये स्थान देऊ नका, म्हणजे आपोआपच लोकसंख्या नियंत्रणात येईल, असेही रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -